नागपूर: प्रतीक्षा भोसले (२८ वर्षे, रा. बारामती, पुणे), असे मृत महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे प्रशिक्षण केंद्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या नागपूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात जवळपास १२०० महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. प्रियकराने लग्नाचे वचन देऊन दुसऱ्याच तरुणीशी लग्न केल्यामुळे नैराश्यात गेलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पोलीस प्रशिक्षण केंद्रात उघडकीस आली आहे.
काही दिवसांपूर्वीच क्रिकेटपटू कपिल देवने या प्रशिक्षण केंद्रात येऊन महिला पोलिसांचे मनोबल उंचावले होते. कपिल देवच्या भेटीमुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील वातावरणही प्रफुल्लित झाले होते. प्रशिक्षण केंद्रात पुणे, बारामती येथील प्रतीक्षा भोसले ही तरुणीसुद्धा प्रशिक्षण घेत होती.
ती प्रशिक्षण केंद्रात दाखल झाल्यापासूनच एकाकी राहत होती. कौटुंबिक समस्या असल्याचे सांगून ती वेळ मारून नेत होती. सोमवार, ८ जुलै रोजी रात्री सर्वजण झोपी गेल्यानंतर तिने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी ती परेडला हजर न झाल्यामुळे तिच्या सहकारी मुलींनी तिच्या खोलीत डोकावून बघितले असता प्रतीक्षा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्यांनी लगेच वरिष्ठांना माहिती दिली. याप्रकरणी बजाजनगर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी पंचनामा केला आणि सूचनेवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. प्रतीक्षाच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली.
प्रतीक्षा आणि तिचा प्रियकर एकाच अकादमीत प्रशिक्षण घेण्यासाठी होते. दोघांची ओळख झाली आणि प्रेमात पडले. त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णयही घेतला होता. प्रतीक्षा विवाहित होती. तिने पतीशी घटस्फोट घेतला होता. आईला मुलीच्या प्रेमप्रकरणाबाबत सर्व माहिती होते. पतीशी घटस्फोट झाल्यानंतर प्रतीक्षाने नव्याने जीवन जगण्याची सुरुवात केली होती. प्रशिक्षण संपल्यानंतर ऑगस्टमध्ये दोघेही लग्न करणार होते. मात्र प्रियकराने प्रतीक्षाला धोका देऊन एप्रिल महिन्यात नातेवाईक मुलीशी लग्न केले. त्यामुळे प्रतीक्षा नैराश्यात गेली. तेव्हापासूनच तिच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत होते. त्यातूनच प्रतीक्षाने आपली जीवनयात्रा संपविल्याची माहिती पुढे येत आहे.
अशा दुर्दैवी घटनांमुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये तणाव वाढला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.